राहुल गांधींची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर गेली कशी - भाजप - ravishankar prasad
राहुल यांची फिरकी घेतानाच रविशंकर यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'आम्ही विकासाचे 'वाड्रा मॉडेल' पाहिले आहे. केवळ ६ ते ७ लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि ७०० ते ८०० कोटींचे मालक व्हा. आता विकासाचे 'राहुल मॉडेल' पाहात आहोत,' त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांचे रणांगण जवळ आले आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संपत्ती १० वर्षांत ५५ लाखांवरून ९ कोटींवर गेलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी २००४ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ५५ लाख ३८ हजार १२३ रुपये अशी जाहीर केली होती. २००९ मध्ये ही संपत्ती २ कोटी तर, २०१४ मध्ये ९ कोटी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना उत्पन्नाचे साधन 'सॅलरी' अर्थात 'पगार' असे म्हटले आहे. जर राहुल यांच्या उत्पन्नाचे साधन पगार असेल, तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे की त्यांची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर कशी काय पोहचली, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. राहुल गांधी खासदार आहेत. त्यांना सरकारकडून मिळणारा पगार हे त्यांनी त्यांचे उत्पन्नाचे साधन दाखवले आहे. मग त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आता या आरोपांना काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल यांची फिरकी घेतानाच रविशंकर यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'आम्ही विकासाचे 'वाड्रा मॉडेल' पाहिले आहे. केवळ ६ ते ७ लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि ७०० ते ८०० कोटींचे मालक व्हा. आता विकासाचे 'राहुल मॉडेल' पाहात आहोत,' त्यांनी म्हटले आहे. 'राहुल यांनी युनिटेक कंपनीकडून २ मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सुरू करणाऱ्या दोघांपैकी एकजण २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तुरुंगवास भोगत आहे. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा भाजप सत्तेत येण्यापूर्वी घडला होता,' असे ते पुढे म्हणाले.
देश निवडणुकीच्या उंबरठ्यावर आहे. सर्वच विरोधक एकमेकांना भ्रष्टाचारी आणि स्वतःला स्वच्छ प्रतिमेचे सिद्ध करू पाहात आहे. एकीकडे राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांवर टीकेचे ताशेरे झाडत आहेत. 'चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांनी लोकप्रिय केली. तर आता भाजप नेत्यांनीही त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. राहुल गांधींनी त्यांची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर कशी पोहचली याचे उत्तर द्यावे असे आता भाजपने म्हटले आहे.