नवी दिल्ली - डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, कोरोना, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन अशा अनेक मुद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा देशातील कोरोना लस वितरण धोरणावरून मोदींवर टीका केली. त्यांनी टि्वट्च्या माध्यमातून मोदींना चार प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यायला हवीत, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांना राहुल गांधींनी विचारलेले चार प्रश्न -
1. सर्व करोना लसींपैकी भारत सरकार कोणती लस निवडणार व का?
2. लस पहिल्यांदा कोणाला मिळणार व वितरण धोरण काय असणार?
3. पीएम केअर फंडचा वापर हा लस नागरिकांना मोफत उपलब्ध व्हावी यासाठी केला जाईल का?
4. संपूर्ण भारतीयांना कधीपर्यंत लस दिली जाईल?
कोरोना लस -
जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लस शोधली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा करताना कोरोना लस संशोधनासाठी स्वतंत्रपणे ९०० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली आहे. हा निधी स्वतंत्रपणे जैवतंत्रज्ञान विभागाला देण्यात येणार आहे. कोरोना लस आल्यानंतर प्रथम प्राधान्य हे आरोग्य कर्मचाऱ्यांना अर्थात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेवकांना असणार आहे. याअनुषंगाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा केली जात आहे.
गांधी कुटुंब गोव्यात -
तथापि, नवी दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात पोहोचल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील होते. वाढते प्रदूषण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी त्यांनी दिल्लीहून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. ते काही दिवस गोव्यात थांबणार आहेत. सोनिया गांधी यांना दोन ऑगस्टला दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्या मेडिकेशनवर आहेत.