नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्याबद्दल डीआरडीओचे (डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) अभिनंदन केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'हॅप्पी वर्ल्ड थिएटर डे' म्हणजे 'जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा' असे ट्विट करत टोला लगावला आहे.
राहुल गांधींकडून 'मिशन शक्ती'साठी डीआरडीओचे कौतुक; तर, मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा - akhilesh yadav
'मिशन शक्ती'मुळे भारताने अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले असून, देशासाठी हा अभिमानाचा दिवस आहे, असे मोदींनी म्हटले आहे. या घटनेचा मोठा गवगवा केल्यावरून राहुल गांधींनी मोदींना रंगभूमी दिनाच्या उपहासात्मक शुभेच्छा दिल्या.
'डीआरडीओने खूप छान काम केले. त्यांच्याविषयी अभिमान वाटत आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनाही जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी डीआरडीओच्या यशाची देशाला माहिती देतानाही त्याचाही राजकीय वापर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींची आजची घोषणा म्हणजे नाटकबाजी आणि जाहिरातबाजीच्या सर्व सीमा पार झाल्या आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना डीआरडीओच्या कार्याचे श्रेय मोदी स्वतः लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोठी घोषणा केली. भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवल्याचे मोदींनी म्हटले आहे. भारताने 'ए-सॅट' या उपग्रहविरोधी मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडला. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. काही वेळापूर्वीच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात ३०० किमी दूर लो-अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडले. 'मिशन शक्ती'मुळे भारताने अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले असून, देशासाठी हा अभिमानाचा दिवस आहे, असे मोदींनी म्हटले आहे. या घटनेचा मोठा गवगवा केल्यावरून राहुल गांधींनी मोदींना रंगभूमी दिनाच्या उपहासात्मक शुभेच्छा दिल्या.
ममता बॅनर्जी यांनीही या घटनेवरून मोदींवर टीका केली आहे. 'डीआरडीओच्या यशाची घोषणा करताना मोदींनी स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. अशी संधी सोडतील, ते मोदी कसले? हे त्यांचे नेहमीचेच झाले आहे,' असे त्या म्हणाल्या. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी टेलिव्हिजनचा एक तास फुकट वापरला. त्यांनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारी, महिलांची सुरक्षा याविषयीच्या समस्या अजून तशाच आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी डीआरडीओचे मोहीम यशस्वी झाल्याबद्दल कौतुकही केले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर हल्ला चढवला आहे. 'भारतीय अंतराळ कार्यक्रमातील आजच्या टप्प्यासाठीचा पाया २०१२ मध्ये काँग्रेसच्या काळातच रचला गेला होता. तसेच, भारताला अंतराळ कार्यक्रमात पुढे नेण्याचे ध्येय पंडित नेहरूंनी डोळ्यांसमोर ठेवले होते. याचीच फळे आज चाखायला मिळत आहेत. भारतासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे,' असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.