नवी दिल्ली -जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शनिवारी विरोधी नेत्यांसह काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा ही ज्येष्ठ नेते मंडळी असणार आहेत.
विरोधी पक्षांच्या नेत्यांसह राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावर, नागरिकांची घेणार भेट - सीताराम येचुरी
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आज(शनिवारी) काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.
कलम 370 रद्द केल्यामुळे राज्यात हिंसाचार उफाळला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत. सांप्रदायीक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला, अशी टीका केली होती.
तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देऊ. आम्हाला तुमच्या विमानाची गरज लागणार नाही. मात्र कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि काश्मीरमधील लोक, तेथील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना दिले होते.