नवी दिल्ली -केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोयल यांच्यावर हल्लाबोल केला. धर्मांध लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. त्यांना या गोष्टीची कल्पनाही नाही की, एक चांगला व्यावसायिक व्यक्ती कसा असतो, असा टोला त्यांनी गोयल यांना लगावला.
पीयूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. केंद्रीय मंत्री माझ्या व्यवसायिक दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असे अभिजित बॅनर्जी यांनी पीयूष गोयल यांचे नाव न घेता शनिवारी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.
'प्रिय बॅनर्जी, हे धर्मांध लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. त्यांना या गोष्टीची कल्पना ही नाही की, एक चांगला व्यवसायिक व्यक्ती कसा असतो. जरी तुम्ही एक दशकपर्यंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरी ते ही गोष्ट समजू शकणार नाहीत. भारतीय जनतेला तुमच्यावर गर्व आहे, हे लक्षात ठेवा की', असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. दरम्यान शनिवारी प्रियंका गांधी यांनी देखील भाजपच्या मंत्र्याच काम अर्थव्यस्था सुधारणे आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नाही, असा टोला गोयल यांना लगावला होता.
काय प्रकरण?
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणा साधला होता. अभिजित यांनी काँग्रेसला न्याय योजना तयार करण्यासाठी मदत केली होती. जी योजना भारतीय जनतेन पाहिलीही आणि नाकारली ही. त्यांच्याविषयी लोकांना माहिती आहे की, ते डाव्या विचारधारेला समर्थन करतात, असे गोयल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
कोण आहेत अभिजित बॅनर्जी?
यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.