नवी दिल्ली -कोरोना महामारीच्या काळात आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना वॉरिअर्स ‘आशा’ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. काम करताना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या या मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे. या संपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. ‘सरकार आधीपासूनच गप्प आहे. मात्र, आता ते कदाचित आंधळे आणि बहिरे देखील झाले असावे’, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
‘आशा कर्मचारी देशभरातील कुटुंबाचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. त्या खऱ्या अर्थाने ’हेल्थ वॉरिअर्स' आहेत. मात्र, आज हक्कांसाठी त्यांना नाईलाजाने संपावर जाण्याची वेळ आली आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. एका माध्यमाचे वृत्त टॅग करत त्यांनी ट्विट केले आहे.
आशा कर्मचारी म्हणजेच ‘अॅक्रिडेटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट’, अंगणवाडी कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून दोन दिवसांचा देश पातळीवरील संप पुकारला आहे. काम करताना चांगल्या सोई सुविधा मिळाव्या अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे. दहा कामगार संघटनांनी संयुक्त पत्रक जारी करत संपाची माहिती दिली आहे. 7 आणी 8 ऑगस्ट दोन दिवस संप असणार आहे.
देशात कोरोनाचा प्रसार होेऊन चार महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. तेव्हापासून आशा कर्मचाऱ्यांसह सर्वच आरोग्य कर्मचारी आघाडीवर काम करत आहेत. काम करताना सुरक्षा, विमा, धोका भत्ता सरकारकडून मिळत नसल्याचे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कर्मचाऱ्यांचा काम करताना मृत्यू देखील झाला आहे. आमचे वेतनही वेळेवर देण्यात येत नाही. प्रलंबित वेतन आणि भत्ते तत्काळ सरकारने द्यावी, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे.