नवी दिल्ली -काँग्रेसकडून चार वेळा खासदार आणि दोनदा केंद्रीय मंत्री राहिलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपशी घरोबा केला आहे. आज त्यावर राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासोबतचे एक जुने छायाचित्र टि्वटवर शेअर केले आहे.
राहुल गांधी, कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया छायाचित्रामध्ये आहेत. संबधीत छायाचित्र हे १३ डिसेंबर २०१८ रोजीचे असल्याची माहिती आहे. छायाचित्रासोबच राहुल गांधी यांनी लिओ टॉलस्टॉय यांचे 'संयम आणि वेळ दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत' हे वाक्य लिहिलं आहे.
ज्योतिरादित्या सिंधिया यांच्या भाजप प्रवेशावर बुधवारी राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. ज्योतिरादित्य हे एकटे नेते होते, जे माझ्या घरी कधीही येऊ शकत होते, असे राहुल गांधी म्हणाले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जे. पी नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी सिंधिया यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करू, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने सर्व आमदार सुरक्षिततेसाठी राजस्थानातील जयपूर शहरात हलविले आहेत.