नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही स्थलांतरीत मजुरांची भेट घेतली होती. त्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शनिवारी सकाळी आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या भेटीवरून विरोधकांनी राहुल गांधींवर टीका केली होती.
काही दिवसांपूर्वी मी कष्टकरी स्थलांतरीत कामगारांची भेट घेतली होती. ते हरियाणापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातील झांशी येथे त्यांच्या गावी जायला निघाले होते. धैर्य, दृढनिश्चय आणि आत्मनिर्भरतेबद्दलची त्यांची अविश्वसनीय कथा माझ्या युट्यूब चॅनेलवर पहा, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुखदेव विहार फ्लायओव्हर परिसरामध्ये असलेल्या काही स्थलांतरित कामगारांशी जवळपास तासभर चर्चा केली होती.
दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधीच्या स्थलांतरीत मजुरांच्या घेतलेल्या या भेटीला 'ड्रामेबाजी' म्हटले होते. राहुल गांधी यांनी कामगारांसमवेत बसून त्यांच्याशी बोलण्यात आपला वेळ वाया घालवला. त्यांनी कामगारांचे सामान उचलून त्यांच्याबरोबर पायी चालत जायला हवे होते, असे अर्थमंत्री म्हणाल्या होत्या.