तिरुवनंतपुरम - काँगेस पक्ष सॉफ्ट हिंदुत्वासाठी ओळखला जातो, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनावर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मतांमध्ये नवीन काही नाही, ते काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर वाटचाल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
राजीव गांधी, नरसिंहराव यांच्या काळातही काँग्रेसची जी भूमिका होती ती अजूनही आहे. धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, त्यांची काही भूमिका असती तर देशाची परिस्थिती आता आहे तशी झाली नसती, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांची राम मंदिराबद्दलची भूमिका नवी नाही, ते काँग्रेसचे सॉफ्ट हिंदुत्व पुढे चालवत आहेत, असे त्यांनी अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाच्या संदर्भात विचारले असता म्हटले.