मुंबई- पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप - रा. स्व संघाच्या विचारधारेचा कथित संबंध असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. या दाव्यावरील सुनावणी माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे आज झाली. यासाठी राहुल गांधी न्यायालयात हजर झाले होते. याचबरोबर सीताराम येचुरीदेखील येथे हजर झाले होते. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर राहुल गांधींचा जामीन मंजूर झाला आहे.
'मी दोषी नाही,असे ठामपणे राहुल यांनी कोर्टात सांगितले आहे. मी गरीब आणि शेतकऱ्यांसोबत असून हा लढा असाच सुरु राहणार असल्याचं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. राजीनाम्यासंबधीत सर्व गोष्टी पत्रात नमूद केल्या आहेत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला होणार आहे.
मानहानी प्रकरण : 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर
जो भाजपच्या विचारधारेच्या विरुद्ध बोलतो किंवा संघाच्या विचारांविरोधात बोलतो, त्याच्यावर दबाव येवू शकतो, त्याला ठारही केले जाऊ शकते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. तर गौरी लंकेश यांच्या हत्येमागे रा. स्व. संघाचे विचार आणि संघाचे कार्यकर्ते या आहेत, असे येचुरी यांनी देखील म्हटले होते.
रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आणि वकील धृतीमान जोशी यांनी 2017 मध्ये राहुल गांधी, युपीएच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी तसेच माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरोधात खासगी तक्रार दाखल केली होती. मुंबईचे महानगर दंडाधिकाऱ्यांनी काँग्रचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरींना समन्स बजावले होते.
गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी सप्टेंबर 2017 रोजी उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटाने गोळ्या घालून हत्या केली होती.