राहुल गांधींचे सुषमाजींच्या पतींना पत्र; म्हणाले, असामान्य संसदपटू आणि प्रतिभासंपन्न वक्ता गमावला - extraordinary parliamentarian
राहुल गांधींनी बुधवारी दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. सुषमाजींच्या मृत्यूमुळे देशाने एक असामान्य संसदपटू गमावल्याचे ते म्हणाले.
![राहुल गांधींचे सुषमाजींच्या पतींना पत्र; म्हणाले, असामान्य संसदपटू आणि प्रतिभासंपन्न वक्ता गमावला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4073804-966-4073804-1565235804599.jpg)
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधींनी बुधवारी दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रातून त्यांनी स्वराज यांचे सांत्वनही केले आहे. सुषमाजींच्या मृत्यूमुळे देशाने एक असामान्य संसदपटू आणि ईश्वरी देणगी लाभलेला प्रतिभासंपन्न वक्ता गमावला, असे राहुल गांधींनी पत्रात लिहिले आहे.
'तुमच्या पत्नी सुषमाजी यांच्या अचानकपणे निघून जाण्याने मला खूप दुःख होत आहे. आपण एक असामान्य संसदपटू आणि ईश्वरी देणगी लाभलेला प्रतिभासंपन्न वक्ता गमावला आहे,' असे राहुल यांनी म्हटले आहे. 'पराराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांची कटिबद्धता, त्यांची प्रतिसाद देण्याची तत्परता आणि अडचणीत असलेल्या लोकांबद्दलचा दया भाव यामुळे त्यांना लोकांमधून मानसन्मान मिळाला. त्यांच्या स्वतःच्या आजारपणातही लोकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कमी झाली नाही,' असे म्हणत राहुल यांनी सुषमा स्वराज यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
'मी तुमच्या कठीण काळात तुमची कन्या बासुरी आणि तुमच्या सोबत नेहमीच आहे. सुषमाजींचा वारसा नेहमीच जिवंत राहील आणि लाखो भारतीयांच्या जीवनाला स्पर्श करून जाईल. दुःखाच्या प्रसंगात तुमची शांतता आणि धैर्य कायम रहावे, यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो,' असे राहुल यांनी पुढे म्हटले आहे.
माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज आता या जगात नाहीत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ६७ वर्षांच्या होत्या.