नवी दिल्ली -केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 75 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करुन मोदींवर निशाणा साधला आहे. लवकरच कोरोना विषाणूवर उपाययोजना केल्या नाही. तर देशातली अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'कोरोना विषाणू हा सर्वांत मोठी समस्या बनला आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या सुटणार नाही. जर यावर भक्कम उपाययोजना केली नाही. तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त होईल', असे टि्वट राहुल गांधींनी केली आहे. यापूर्वीदेखील राहुल गांधींनी टि्वट करून मोदींना कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते.
जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही हात-पाय पसरायला सुरवात केली आहे. भारतामध्ये एकूण रुग्णांची संख्या 75 पेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. तसेच अनेक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकराने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे. तर महाराष्ट्रातील नागरिक ०२० - २६१२७३९४ या नंबरवर संपर्क साधू शकतात. याबरोबरच १५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठीही मदत क्रमांक जारी केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत माहीत दिली.
हेही वाचा -कोरोना: केंद्र सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी जारी केले हेल्पलाईन नंबर