नवी दिल्ली - अर्थव्यवस्था, कोरोना संकट, रसातळाला गेलेला जीडीपी या मुद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदींना लक्ष्य करत आहेत. आज पुन्हा राहुल गांधींनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरून मोदींवर निशाणा साधला आहे. 'अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटित वर्गासाठी मृत्युदंडासारखा ठरला आहे. 21 दिवसांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोनाऐवजी लघू उद्योग आणि रोजगार नष्ट केले', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.
'असंघटित वर्गासाठी मृत्यूदंडासारखा ठरला लॉकडाऊन' - काँग्रेस नेते राहुल गांधी
राहुल गांधींनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरून मोदींवर निशाणा साधला आहे. 'अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटित वर्गासाठी मृत्यूदंडासारखा ठरला, असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था कशी नष्ट केली, या शीर्षकाखाली राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ सिरीज सुरू केली आहे. या सिरीजच्या चौथ्या भागात राहुल गांधींनी लॉकडाऊनवरून मोदींवर टीका केली आहे. कोरोनाच्या नावाखाली सरकारने असंघटीत क्षेत्रावर प्रहार केला. 97 लाख प्रवासी कामगार घरी पाठवण्यात आले. लॉकडाऊनमुळे 20 ते 30 वयोगटातील 2.7 कोटी युवकांचे रोजगार गेले. लॉकडाऊन उघडण्याची वेळ आल्यानंतर सरकारने न्याय योजना लागू करावी, अशी विनंती काँग्रेसने केंद्र सरकारला केली. मात्र, त्यांनी ऐकले नाही. लॉकडाऊनने कोरोनावर नाही, तर गरिबांवर, रोजगारावर, उद्योगावर आक्रमण केले, असे राहुल गांधींनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओ सिरीजच्या तिसऱ्या भागात राहुल गांधींनी मोदी सरकारचा 'गब्बर सिंग टॅक्स' हा घसरत्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत मोठे कारण असल्याचं म्हटलं होतं. तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही करप्रणाली नाही. तर ती भारताच्या गरिबांवरील आक्रमण आहे. जीएसटी म्हणजे अर्थिक सर्वनाश, असे ते म्हणाले होते. कोरोना महामारीमुळे देशात 25 मार्चला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे. बांधकाम, व्यापार, निर्मिती, पर्यटन, मनोरंजन यासह सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेकांचे रोजगारही गेले आहेत. तर उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत.