हैदराबाद - प्रतिष्ठित श्रीराम कॉलेजमधील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली. ऐश्वर्या रेड्डी असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षण घेण्यात आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने आत्महत्या केल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जाणूनबुजून केलेल्या नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली आहेत. हेच सत्य आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी ऐश्वर्या रेड्डी या तरुणीचे वडील मेकॅनिक होते. ऐश्वर्याचे आयएसएस होण्याचे स्वप्न होते. मात्र,वडिलांकडे तितके पैसे नव्हते. लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणसाठी ते तिला लॅपटॉप घेऊन देऊ शकले नाही. शिक्षण घेता येत नसल्याने 2 नोव्हेंबरला ऐश्वर्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. माझ्यामुळे आई-वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबावर माझे ओझे झाले आहे. माझे शिक्षण एक ओझे झाले आहे. जर मी शिक्षण घेऊ शकत नाही. तर माझी जगण्याची इच्छा नाही, असे ऐश्वर्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.