नवी दिल्ली - जगातील 15 मोठ्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'टाळ्या वाजवल्याने देशातील छोटे व्यवसायिक आणि मजुरांना मदत मिळणार नाही', असे राहुल गांधींनी टि्वट केले आहे.
'आपल्या नाजूक असलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूने प्रहार केला आहे. लहान आणि मध्यम व्यवसायिक तसेच मजुरी कामगार हे कोरोनामुळे जास्त प्रभावित झाले आहेत. टाळ्या वाजवल्याने त्यांना मदत मिळणार नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे', असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 271 वर पोहचली आहे. कोरोनाने देशाचे अर्थकारण ढवळून निघाले आहे. कोरोनाचा विविध उद्योगांवर परिणाम होत आहे. दिल्लीमधील सर्व मोठ्या घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा आज बंद राहिल्या आहेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी संघटनेने तीन दिवसाचा बंद आजपासून जाहीर केला आहे. तसेच लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याने त्याचा शेअर बाजारावरही प्रभाव पडत आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी जनतेला 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. तसेच, आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.