अहमदाबाद - केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधीवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी न्यायलयात हजर राहाण्यापासून राहुल गांधींना सुट मिळाली आहे. राहुल गांधींवर फौजदारी मानहाणीचा गुन्हा दाखल आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी आर. बी. इतालिया यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
शाह यांचा उल्लेख 'खून प्रकरणातील आरोपी'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राहुल गांधींनी 'खून प्रकरणातील आरोपी' असे संबोधले होते. २०१९ साली राजस्थानातील लोकसभा निवडणूक रॅलीत त्यांनी शाह यांच्यावर टीका करताना हे वक्तव्य केले होते. राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्यापासून सुट मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकीलांनी न्यायालयात केली होती. कारण, राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचे नेते असून ते कामात व्यस्त असतात, असा युक्तिवाद त्यांच्या वकीलांनी केला होता.
अहमदाबादमधील भाजप नगरसेवक कृष्णावधान ब्रम्हाभट्ट यांनी राहुल गांधींविरोधात फौजदारी मानहाणीचा खटला दाखल केला होता. ब्रम्हाभट्ट यांनी नियुक्त केलेल्या वकीलांची बदली झाल्यानंतर खटला रेंगाळला होता. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.