चंदीगढ : कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसची खेती बचाओ यात्रा आज हरियाणामध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कृषी कायदे ते चीन अशा विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले.
सध्याच्या अन्न सुरक्षा रचनेला पूर्णपणे नष्ट करणारे हे तीन कृषी कायदे आहेत. या कृषी कायद्यांमुळे पंजाबचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवर सरकारने केलेला हल्ला आहे, असे मत राहुल यांनी पटियालामध्ये व्यक्त केले.
हाथरसमधील कुटुंबाला सरकारच करतेय लक्ष्य..
हाथरस प्रकरणामध्ये त्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकार लक्ष्य करत आहे. मात्र, मोदींनी याप्रकरणी एक शब्दही काढला नाही. आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना हे सांगायचे होते की, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या लढाईमदध्ये ते एकटे नाहीत, हे त्यांना सांगण्यासाठी आम्ही हाथरसला गेलो, असे राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केले.