कोलकाता -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज पश्चिम बंगालच्या मालदा येथे जाहीर सभा झाली. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. मोदींनी कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच एकीकडे मोदी खोटे बोलतात तर दुसरीकडे ममता बॅनर्जी खोटी आश्वासने देतात, अशा शब्दात राहुल यांनी मोदी आणि ममतांवर टीका केली.
बंगालमधील अनेक वर्षे तुम्ही सीपीएमचे सरकार बघितले. त्यांनी खूप काळ महायुतीचे सरकार चालविले. त्यानंतर तुम्ही ममताजींना निवडून दिले. सीपीएमच्या काळात जे अत्याचार होत होते, तेच आता ममता सरकारच्या काळात होत असल्याचे राहुल म्हणाले. संपूर्ण बंगालला केवळ एक व्यक्ती चालवते. काय संपूर्ण प्रदेशाला केवळ एका व्यक्तीला चालवू द्यायला पाहिजे?, असा सवालही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला. बंगालच्या विकासासाठी काँग्रेसचे सरकार आवश्यक असल्याचेही राहुल म्हणाले.