नवी दिल्ली - 'चौकीदार चोर है' या घोषणेविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफीनामा सादर केला आहे. भाजपच्या महिला नेत्या मिनाक्षी लेखी यांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रचाराच्या वेळी आपल्या तोंडातून चुकून हे वाक्य निघाल्याची कबूली राहुल गांधी यांनी या माफीनाम्यात दिली.
कथित राफेल प्रकरणारवून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना घेरले होते. त्यासाठी त्यांनी 'चौकीदार चोर है' या घोषणेचा उपयोग केला. राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यांनतर ही घोषणा अधिकच तीव्र होत गेली. त्यानंतर राहुल गांधी यांनी एके ठिकाणी पत्रकारांशी बोलताना न्यायालयानेही मानले की चौकीदार चोर है, असे म्हटले होते. त्यांच्या या वाक्यावर मिनाक्षी लेखी यांनी आक्षेप नोंदवला होता.
न्यायालयाने चौकीदार चोर है असे म्हटलेच नाही. राहुल गांधींनी चक्क न्यायालयाचा अपमान केला. त्यामुळे यांच्यावर न्यायालयाच्या अवमाननेचा खटला चालावा, अशी तक्रार लेखी यांनी केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयाने नोटीस जारी केली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी आज आपला माफीनामा न्यायालयात सादर केला आहे.
न्यायालयाने १४ डिसेंबर २०१८ ला दिलेल्या सुनावणीची प्रत आपल्याजवळ उपलब्ध नव्हती. किंवा न्यायालयाच्या साईटवरही ती आपणास वाचायला मिळाली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जेही आपल्या कानावर पडले किंवा आपण वाचले त्याचीच प्रतिक्रीया आपण दिली, असे राहुल गांधी यांनी आपल्या माफीनाम्यात लिहीले आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्याही परिस्थितीत अवमान करायचा नव्हता. राफेल प्रकरणात पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल भाष्य करताना आपण चुकलो त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी आपल्या माफीनाम्यात नमूद केले आहे.