लखनौ -'ज्याप्रकारे प्रियांकाजींनी सांगितले की, आज टीव्ही सुरू करा पंतप्रधान मोदी दिसतात, रेडिओ सुरू करा मोदी दिसतात, रस्त्यावर फिरायला गेलो तरी मोदीच दिसतात. इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यासाठी पैसा आला कुठून?, असा सवाल करत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली. ते उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.
आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणे सुरू केले आहे. माझे असे स्वप्न आहे की याचप्रकारचे काम उत्तर प्रदेशातही सुरू व्हावे, असे राहुल म्हणाले. आम्ही तिन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सर्व जिल्ह्यात 'फूड प्रोसेसिंग युनिट' सुरू करण्यास सांगितले असल्याचेही राहुल म्हणाले. ज्याठिकाणी बटाट्यांचे उत्पादन घेतले जाते तिथेच चिप्स बनवण्याच्या कंपनी सुरू करण्यात येतील. जिथे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते तिथे टोमॅटो केच-अपची कंपनी सुरू करण्यात येईल. शेतकरी त्यांचे उत्पादन सरळ कंपनीत विकू शकतील, असेही राहुल म्हणाले.