नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे आज दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते.
रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाने संपूर्ण बिहारवर शोककळा पसरली असून लालू प्रसाद यांनी शोक व्यक्त केला.
2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांचा पराभव झाला होता. रामा सिंह यांनी रामविलास पासवान यांच्या लोजपा पक्षाकडून रघुवंश यांचा वैशाली मतदारसंघात पराभव केला होता.
गुरुवारी रघुवंश प्रसाद सिंह यांनी लालू यांना पत्र लिहून पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माजी खासदार रामा सिंह यांचा राजदमध्ये समावेश केल्याने ते नाराज होते. 'मी जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर 32 वर्षं तुमच्या पाठीशी उभा होते. मात्र, आता नाही. पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिले. मला माफ करा', असे त्यांनी लालूंना लिहलेल्या पत्रात म्हटलं होते. मात्र, लालू यांनी 'आधी स्वस्थ व्हा, नंतर यावर चर्चा करू', असे म्हणत राजीनामा नामंजूर केला होता.