नवी दिल्ली - बहुप्रतीक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय वायूदलात समावेश झाला आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला कडक इशारा दिला. सीमेवर ज्या प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले आहे. ते लक्षात घेता, राफेलच्या भारतीय वायूदलातील समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
'शत्रुला धडा शिकवण्यासाठी राफेल सक्षम'; राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा - राजनाथ सिंह यांचा चीनला ईशारा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला कडक इशारा दिला. सीमेवर कोणत्याही कारवाईला भारत उत्तर देण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले.
सीमेवर कोणत्याही कारवाईला भारत उत्तर देण्यास सक्षम आहे. देशाची सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी राफेल अत्यंत महत्त्वाचे आहे. फॉरवर्ड सीमेवर तत्काळ विमानं तैनात करून शत्रुला योग्य संदेश देण्यात आला असून वायूसेना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे , असेही राजनाथ म्हणाले. तसेच राफेल हे फ्रान्स आणि भारताच्या दृढ आणि रणनितीक संबंधांचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर लढाऊ विमान राफेलचा औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय वायूदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे. कार्यक्रमात फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. राफेलचा समावेश करताना सर्वधर्म पूजा करण्यात आली. यावेळी विविध विमानांच्या कसरतींचे सादरीकरण करण्यात आले. तसेच तेजस विमानांसह ‘सारंग'ने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या.