हैदराबाद - देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरी देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धयांना देखील मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे.
कोरोना झालेल्या व्यक्तींना मानसिक आधाराची, पाठबळाची मोठी गरज असते. त्या व्यक्तींशी सकारात्मक बोलत रहायलाच हवे. आजपर्यंत राचकोंडा पोलीस कार्यक्षेत्रात 520 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातले 325 पोलिसांनी कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर जॉईन झाले आहेत. कोरोना झालेल्या पोलिसांना आधार देण्यासाठी तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांचे मोठे योगदान आहे.
कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलिसांचे अभिनंदन महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याच दिवशी मी आणि वरीष्ठ सहकारी फोन करून कोरोना झाला म्हणून घाबरू नकोस, सर्व पथ्य पाळ, औषधे व ड्राय फ्रुट्सचा पॅक तुझ्या घरी आजच येत आहे. तसेच त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये 5 हजार रुपये ताबडतोब जमा करत असल्याचेही भागवत यांनी सांगितले. कोरोना झालेल्या पोलिसांना कोविड पॉझिटिव्ह व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये अॅड केले जाते. तसेच त्यांच्या देखभालीसाठी 24 तास डॉक्टर उपलब्ध असून, आम्हीही त्याच्यासोबत असल्याचे महेश भागवत यांनी सांगितले.
राचकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त आणि तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत दोन ते तीन दिवसांनंतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह सहकाऱ्यांसाठी झूम कॉलवर ऑनलाईन समुपदेशन केले जाते. यात माझ्यासोबत, डॉ अविनाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त, नुकतेच कोरोनामुक्त झालेले सहकारी त्यात प्रत्यक्ष संवाद साधून कुणाला काय कोरोनाची लक्षणं आहेत का? कुणाला हॉस्पिटलमध्ये पाठवणे गरजेचे आहे का? घरातल्या व्यक्तींची टेस्ट झाली का? काही सामाजिक आणि इतर अडचण आहे का? या विषयी मार्गदर्शन करत असलाचेही महेश भागवत सांगतात.
कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलिसांचे अभिनंदन दरम्यान, राचकोंडा परिक्षेत्रामधील 99 टक्के कोरोनाबाधित पोलीस होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ज्यांना कोमॉरबीडीटी म्हणजेच दुसरे दिर्घकालीन आजार आहेत आणि कोरोनाची लक्षणं आहेत, अशांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. तेथे आमचा एक अधिकारी मदतीसाठी असतो. सर्व वरीष्ठ आणि ड्युटी डॉक्टरबरोबर आम्ही नियमित बोलतो. दोन सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा डोनेट केला आज ते घरी आहेत. अतिशय क्रिटिकल परिस्तिथीमधूनही व्हेंटिलेटरवरील सहकारीपण बाहेर येत आहेत. त्यांचा आनंद शब्दात सांगणं अवघड असल्याचेही महेश भागवत यांनी सांगितले.
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर पोलिसांचे अभिनंदन महेश भागवत सांगतात, ड्युटीवर रुजू होण्यासाठी आम्ही 15 दिवसानंतर RTPCR टेस्ट करून ती निगेटिव्ह आल्यावरच 20, 21 व्या दिवशी रुजू करून घेतो. त्यांचा मोठा सत्कार करून एक प्रशंसा पत्र व भेट वस्तू देतो आणि त्यांचे अनुभव ऐकतो. अनेक जण ते सांगताना भावनाविवश होतात. त्याचबरोबर प्लाझ्मा डोनेटसाठी सिम्पटोमॅटिक सहकाऱ्यांना समुपदेशन ही करतो. पुढे ते म्हणतात, मला वाटते की कोरोनाच्या लढाईत आपण एकटे नसून पूर्ण पोलीस यंत्रणा आपल्या मागे आहे, हा दिलासा नक्कीच कोठेतरी त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी कामी येत आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून चालणार नाही आपल्याला त्याच्यासोबत आता जगायचं आहे. तेव्हा सकारात्मक राहा. आपल्याला ही लढाई औषध बाजारात येईपर्यंत लढायची आहे. पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामाच्या काळात मराठा आणि नजीबखान रोहिला यांच्यातील लढाईत दत्ताजी शिंदे यांनी जीवाची बाजी लावून अप्रतिम पराक्रम दाखवला. जेव्हा नजीब त्यांच्यावर कपटाने वार करत त्यांना विचारतो, क्या पाटील लढोगे? तेव्हा दत्ताजींचे शेवटचे उद्गार आठवतात, 'बचेंगे तो और भी लढेंगे', लढणं आपल्या हातात आहे आणि सर्वांची साथ घेत, सर्वांना साथ देत जिंकण्यासाठीच आपल्याला लढायचे आहे, असे महेश भागवत यांनी सांगितले
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर पोलिसांचे अभिनंदन