चेन्नई - पद्दुचेरी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. यावेळी रबीहा अब्दुरहीम या कला शाखेच्या विद्यार्थिनीने जनसंज्ञापन विषयातील सुवर्णपदक नाकारले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून आपण हे सुवर्णपदक नाकारल्याचे तिने सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्ट केले आहे.
नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक! दीक्षांत समारंभादरम्यान बाहेर जाण्यास सांगितले..
या समारंभाला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या आगमनाआधी, रबीहाला पोलिसांनी दुसरीकडे बसण्यास सांगितले. राष्ट्रपतींच्या जाण्यानंतर तिला पुन्हा सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली. असे करण्यामागचे कारण विचारले असता, काहीही स्पष्टपणे सांगण्यास त्यांनी नकार दिला. आतमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या स्कार्फ घालण्याची पद्धत त्यांना आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यांनी असे केले. मात्र, याबाबत नेमके कारण समजू शकले नाही.
त्यानंतर जेव्हा पदक आणि पदवीदान समारंभात तिचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा तिने नम्रपणे आपण सुवर्णपदक नाकारत असल्याचे मान्यवरांना सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून आपण हे सुवर्णपदक नाकारत असल्याचेही तिने स्पष्ट केले. एनआरसी आणि सीएए विरोधात जे लोक अहिंसक मार्गाने लढत आहेत, त्यांच्या समर्थनार्थ मी हे पाऊल उचलले असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा : #CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले