पाटणा - बिहारमध्ये चमकीने थैमान घातल्यानंतर आता जोरदार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
नितीश कुमार जबाबदाऱ्यांपासून पळ काढत आहेत; राबडी देवी यांची टीका - टीका
बिहारमधील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परंतु, सरकार उपाययोजना करण्याऐवजी निसर्गाला दोष देण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेची काळजी नाही, अशी टीका राबडी देवी यांनी केली आहे.
राबडी देवी यांनी ट्विट करताना लिहिले, की बिहारमध्ये चमकीमुळे मृत्यू होत आहेत. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि आता पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, मुख्यमंत्री नितीश कुमार या सर्वांपासून पळ काढताना निसर्गाला दोष देत आहेत. धरण बांधणीमध्ये झालेल्या कोटींच्या घोटाळ्यासाठी कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगावे. उत्तर बिहारमधील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परंतु, सरकार उपाययोजना करण्याऐवजी निसर्गाला दोष देण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. त्यांनी जबाबदारीपासून पळ काढला असून जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे.
मागील १४ वर्षात पूरस्थिती टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर दरवर्षी किती कोटी खर्च केला, याची माहिती नितीश कुमारांनी द्यावी. दरवर्षी मदतनिधी, बचाव मोहिम आणि पूनर्वसनासाठी जेवढा निधी सरकारने खर्च केला आहे तेवढाच निधी उपाययोजनांसाठी खर्च केला असता तर, राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीकाही राबडी देवी यांनी केली.