नवी दिल्ली-भारत छोडो अभियान महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 ला जाहीर केले होते. या काळात जगामध्ये दुसरे महायुद्ध सुरू होते. या अभियानाद्वारे ब्रिटिश सरकारने भारतातील राज्य सोडून द्यावे,अशी मागणी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो. हे आंदोलन फार काळ सुरू राहिले नाही. मात्र, इंग्रजांना आपण भारतावर जास्त काळ राज्य करु शकत नाही, याची जाणीव झाली. हे या आंदोलनाचे यश मानले जाते.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इंग्रजांच्या साम्राज्यवादाविरोधात देशातील जनता उभी राहिली. याच दिवशी महात्मा गांधी यांनी करू किंवा मरू अशी घोषणा दिली. यानंतर संपूर्ण देशातील लोक इंग्रजांविरुद्ध उभे राहिले. मुंबईच्या गवालिया टँक म्हणजेच आताचे आझाद मैदान येथून चळवळ सुरू झाली.
4 जुलै 1942 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये इंग्रजांना भारताबाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सी. राजगोपालचारी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांनी गांधीजींचे ध्येय पूर्ण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबई येथे भारत जोडो अभियानाचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, भारत छोडो अभियान यशस्वी झाले नाही. कारण ब्रिटिशांनी दुसऱ्याच दिवशी आंदोलन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांचा समावेश होता. यातील बरेच नेते 1945 पर्यंत तुरुंगात होते. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर हे आंदोलन हिंसक बनले.
भारत छोडो अभियान किंवा चलेजाव चळवळ सुरू असताना स्वातंत्र्यसैनिकांकडे स्पष्ट असा आराखडा नव्हता. 1943 ला हे अभियान संपले. मात्र, भारत छोडो अभियानाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे स्थान आहे. या आंदोलनामुळे इंग्रज सरकारला भारतामध्ये दीर्घकाळ शासन करता येणार नाही याची जाणीव झाली.