भुवनेश्वर (जगन्नाथपुरी) - स्नान पौर्णिमेला जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेला प्राचीन परंपरेनुसार स्नान घातले जाते. हे स्नान केल्यानंतर तिन्ही देवता आजारी पडतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आजारी पडलेल्या देवतांवर १४ दिवस मंदिराच्या गर्भगृहात विशेष आयुर्वेदिक फुलुरी तेलाने उपचार केले जातात.
जाणून घ्या 'फुलुरी सेवे'च्या सहाय्याने कसे केले जाते भगवान जगन्नाथाला बरे! ही फुलुरी सेवा एका विशिष्ट दिवशीच दिली जाते. वार्षिक रथयात्रा उत्सवाचा एक भाग म्हणून, अनारसाच्या (स्नान पौर्णिमेनंतरचा कालावधी) पाचव्या दिवशी राज वैद्यांच्या देखरेखीखाली देवतांना 'फुलुरी सेवा' दिली जाते. या उपचार सेवेची सुरूवात श्रीमद्भागवताचे लेखक जगन्नाथ दास यांनी केली.
अनसाराच्या चौदा दिवसांच्या विधी दरम्यान विविध औषधी वनस्पतींचा वापर करुन देवतांचे उपचार केले जातात. फुलुरी सेवेसाठी फुलांचे तेल देवतांच्या उपचारासाठी मंदिरात पाठवले जाते. देवतांच्या सेवेसाठी असलेले दैतपती देवतांच्या शरीराला हे तेल लावतात. या दरम्यान देवतांना पातळ अन्नपदार्थांचेच नैवेद्य दिली जातात. कारण आजारी व्यक्तीला पातळ पदार्थच खाऊ घालावेत असा समज आहे. अगदी माणसाप्रमाणे या देवतांची काळजी हे दैतपती घेतात.
१४ दिवसांच्या कालावधील देवतांच्या सेवेत 165 दैतपती तैनात असतात. श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची ही सेवा अतिशय महत्त्वपूर्ण, रहस्यमय आणि अभूतपूर्व विधी मानला जातो. यानंतर देवता आजारातून पूर्णपणे ठीक होऊन वार्षिक रथयात्रेच्या प्रवासाला सज्ज होतात असे समजले जाते.
फुलुरी तेल ओडिया मट यांच्यावतीने पुरवले जाते. या फुलुरी तेलामध्ये- तीळ तेल, बीनाची मुळे, चमेली, जुई आणि मल्ली अशा वेगवेगळ्या सुवासिक फुलांच्या तेलाचा समावेश असतो. वरील सर्व एकत्र मिसळलेले तेल मातीच्या भांड्यात ठेवले जाते. अनसारा कालावधीपर्यंत हे भांडे जमिनीत पुरुन ठेवले जाते. देवता आजारी पडल्या की त्यांच्या उपचारासाठी हे तेल बाहेर काढले जाते, अशी माहिती भगवान जगन्नाथचे सेवक असलेल्या सौम्या रंजन मुदुली यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.