नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. याच आंदोलनादरम्यान दिल्लीतील इंडिया गेटजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक ट्रॅक्टर पेटवल्याची घटना घडली आहे.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांना या आगीची माहिती मिळाली. त्यानंतर आग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्ठळी पाठवण्यात आले. ही आग विझवण्यात यश आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ईश सिंघल यांनी दिली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने या कृषी कायद्यांसंबंधी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत विरोधक शेतकऱ्यांची आणि देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसेच शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच या कायद्याला विरोध करत हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी हे शिष्ट मंडळ राज्यपालांना भेटणार आहे.
हेही वाचा :केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध; आज राज्यपालांना भेटणार काँग्रेसचे शिष्टमंडळ