नवी दिल्ली - वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. मात्र, या विधेयकाला काही राज्यांनी लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. विधेयक लागू करणार नाही, असा पवित्रा पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी घेतला असला तरी नागरिकत्त्व हा विषय केंद्रीय सूचीमध्ये येत असल्याने विधेयक लागू करणे सर्व राज्यांना बंधनकारक असेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -अशांत ईशान्य : 'कॅब'विरोधी आंदोलनाचे लोण पश्चिम बंगालमध्येही; रेल्वे स्थानकावर जाळपोळ
पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यामध्ये लागू होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. नागरिकत्व हा विषय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. तसेच तो केंद्रीय सूचीअंतर्गत येत असल्याने राज्य सरकारला विधेयक लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधेयकाला विरोध करूनही राज्यघटनेने हात बांधले असल्याने विरोध करणाऱ्या राज्यांना काही करता येणार नाही.
तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम) पक्षाने नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे, तर विरोधी पक्ष डीएमकेने विधेयकाला कडाडून विरोध केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा -आसाम : दिब्रुगढमधील संचारबंदी शिथिल