चंदीगड - पाच तासांच्या चर्चेनंतर पंजाब विधानसभेत आज(मंगळवार) चार कृषी विधेयके बहुमताने मंजूर झाली. केंद्रीय कृषी कायद्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ही विधेयक आणली आहेत. या विधेयकांना शिरोमणी अकाली दल, आपसह लोक इन्साफ पार्टी या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. भाजपाने कामकाजात सहभाग घेतला नाही, तरीही विधेयके मंजूर झाली. विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांसह शक्तीप्रदर्शन केले. राज्यपाल पंजाबच्या जनतेचा आवाज ऐकतील आणि विधेयकांवर सह्या करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जर राज्यपाल व्ही. पी. एस बडनोरे यांनी विधेयकांवर सह्या केल्या नाही तर सरकार कायदेशीर मार्गाने लढाई लढेल, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला.
पंजाब सरकारने एमएसपीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी 'फार्मर्स अॅग्रीमेंट ऑन प्राईज अॅश्युरन्स अॅन्ड फार्म सर्व्हिसेस अॅक्ट -२०२०' हे विधेयक मंजूर केले आहे. तांदुळ आणि गहू जर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी/विक्री केला तर कमीत कमी ३ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद विधेयकात केली आहे.