चंदीगड - लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवत पंजाबमधील हजारो स्थलांतरित कामगार मंडी गोविंदगड याठिकाणी जमा झाले होते. कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक विशेष रेल्वे आज येणार असल्याच्या अफवेमुळे हा प्रकार घडला.
लॉकडाऊन लागू झाल्यामुळे देशातील अनेक कामगार परराज्यांमध्ये अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारने या कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वेंची सोय केली आहे. यांपैकीच एक रेल्वे आज पंजाबची स्टील सिटी असलेल्या मंडी गोविंदगड येथे येणार असल्याची अफवा पसरली होती. यामुळे हजारो स्थलांतरीत कामगार आज या शहरात एकत्र आले होते. ही गर्दी पांगवण्यासाठी एसडीएम आनंद सागर आणि डीएसपी सुखविंदर सिंग यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.