चंदिगड- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या या आंदोलना दरम्यान काही आंदोलक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी जीव गमावला आहे. शनिवारी पंजाबच्या आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे.
रुग्णालयात झाला मृत्यू
अमरिंदर सिंग (४०) असे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेगडसाहिब जिल्ह्यातील रहिवासी आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सिंघु सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळीच या शेतकऱ्याने विषारी औषध पिले. त्यानंतर याची माहिती मिळताच इतर आंदोलक शेतकऱ्यांनी अमरिंदर यांना तत्काळ सोनिपत येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांचा उपचाारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती सोनिपतच्या कुडली पोलीस स्टेशनेच पोलीस इन्स्पेक्टर रवी कुमार यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकरी संघटनांकडून स्थानिक पातळीवर आंदोलने सुरूच आहेत. मात्र, दिल्लीच्या सीमांवर पंजाब हरियाणासह देशातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी महिनाभरापूर्वी आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान कृषी कायद्यावरून या आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चेच्या ८ फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नाही. शेतकरी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवरच ठाम आहेत. ज्यावेळी कायदा मागे घेतला जाईल त्याच वेळी आम्ही सीमेवर माघारी जाऊ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.