चंदिगड - कृषी विधेयकांविरोधात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. यासाठी आज (25 सप्टेंबर) 'भारत बंद'ची हाक देण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना काळातील नियमांचे पालन करण्याबाबतही त्यांनी सूचित केले आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणारे अधिकृत पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी कृषि विधेयक दुरुस्तीचा विरोध केला असून शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कलम 144 अंतर्गत कोणावरही कारवाई होणार नसल्याचे सांगितले. मात्र बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून मास्क घालण्याची विनंतीही केली आहे.