पुणे- पुण्याहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले. उड्डाणाच्या तयारीत असताना वैमानिकाला धावपट्टीवर अचानक एक जीप दिसली. जीपला वाचवण्याच्या प्रयत्नात विमान लवकर हवेत नेण्याचा प्रयत्न वैमानिकाने केला. मात्र, कमी वेग असल्याने विमानाचा शेपटाकडील भाग जमीनीला घासला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
उड्डाणावेळी विमानाचा वेग जास्त असताना वैमानिकाला धावपट्टीवर अचानक एक व्यक्ती आणि जीप दिसली. त्यामुळे वैमानिकाने लवकर उड्डाणासाठी प्रयत्न केल्याचे पुणे येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. धावपट्टीवरील जीप आणि व्यक्ती विमानतळावरील कर्मचारी होते. काम करत असताना ते धावपट्टीवर आले. उड्डाणावेळी विमानाचा वेळ २०० किमी प्रति तासापेक्षा जास्त असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.