नवी दिल्ली -आम्हाला काही लोक राष्ट्रविरोधी किंवा देशद्रोही समजत आहेत. मात्र, आमचं आंदोलन राष्ट्रविरोधी नाही, असे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून जामियातील विद्यार्थी नव्याने आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत.
आमचे आंदोलन राष्ट्रविरोधी नाही, जामियातील विद्यार्थ्यांची भूमिका - Delhi Police
पोलीस परवानगीशिवाय विद्यापीठात येऊ कसे शकतात, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
दिल्ली पोलिसांनी जामियातील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमारचा निषेध होत आहे. पोलिसांनी आम्हाला वाचनालयातून बाहेर काढून मारहाण केली. तसेच पोलीस आम्हाला दहशतवादी म्हणत असल्याचेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. आम्ही देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
'मी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे माझ्या कुटुंबीयांना वाटत होते. मी इथे आहे याविषयी त्यांना काहीच माहिती नाही. सर्वांनी या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. अन्यथा ती वेळ दूर नाही जेव्हा आपल्या घरावर हल्ला होईल', असे आंदोलनकर्त्या विद्यार्थिनीने सांगितले.
पोलीस परवानगीशिवाय विद्यापीठात येऊ कसे शकतात, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात १४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी होणार आहे.