नवी दिल्ली - उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील आसामला पुराचा जोरदार फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव धोक्यात आला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण प्रसंगी असहाय्य नागरिकांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले आहे.
बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधील अनेक भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटाचा लाखो लोकांवर परिणाम झाला आहे. पुरामुळे अडचणी सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या अडचणी सापडलेल्या लोकांना शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन मी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना करते, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.