नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले.
उसाचे पीक शेतात वाळत असल्याने आणि कारखान्याकडून पावती न मिळाल्याचे पाहून मुझफ्फरनगर येथील ऊस उत्पादक शेतकऱयाने आत्महत्या केली. 14 दिवसात पूर्ण देय मिळेल, असा दावा भाजपने केला होता. मात्र, हजारो कोटी रुपये दाबून साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत, असे टि्वट प्रियांका गांधींनी केले आहे.
मी दोन दिवसांपूर्वी याबाबत सरकारला इशारा दिला होता. या आर्थिक संकटात पैसै न मिळालेल्या शेतकरी कुटुंबांचे काय होत असेल, असेही प्रियांका गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान जानेवरी महिन्यात उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका केली होती. शेतकरी आणि ऊस उत्पादकांना त्रास सहन करावा लागत असल्याची योगी आदित्यनाथ यांना काहीच कल्पना नाही” असा आरोप त्यांनी केला होता. 2014 पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली असून दररोज 35 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते.