नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आग्रा शहरातील कोरोना मृत्यू दरावरून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. कोरोना संकटात नागरिकांना आणखी बिकट परिस्थितीत ढकलल्याबद्दल योगी सरकारने 48 तासात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आग्र्यातील कोरोनाच्या मृत्यू दरावरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आग्रा शहरातील कोरोना मृत्यू दरावरून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे.
आग्रा शहरात कोरोना मृत्यूदर 6.8 टक्के आहे. हा दर दिल्ली आणि मुंबईपेक्षा जास्त आहे. आग्र्यामध्ये आत्तापर्यंत 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 35 टक्के म्हणजेच 28 रुग्णांचा 48 तासांच्या आत मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी विचारला.
आग्रा मॉडेलबाबत खोटी माहिती पसरवण्यास कोण जबाबदार आहे. कोण लोकांना आणखी बिकट परिस्थितीत ढकलत आहे? मुख्यमंत्र्यांनी 48 तासांच्या आत यावर स्पष्टीकरण द्यावे. योगी आदित्यनाथ सरकारचा कोरोनाबाबत निष्काळजीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, 48 तासात 79 मृत्यू झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे आग्रा जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.