नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी बुधवारी चार पानी पत्र लिहीत आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे प्रियांका गांधींनी समर्थन केले आहे. राहुल गांधींसारखे धाडस फार कमी लोक दाखवतात, असे प्रियांका यांनी ट्विटर करून म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 'काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी या संधीबद्दल ऋणी आहे आणि माझे या संघटनेवर नितांत प्रेम आहे. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. जे घडले ते पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. या कारणाने मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' अशा स्वरूपाचे पत्र लिहीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.