नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. गोवंश संरक्षण प्रकरणी त्यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे. गोवंश संरक्षणासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्तीसगढकडून प्रेरणा घ्यावी, असे प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
ललितपुरच्या सौजना येथील गायींचे मृतदेह पाहून मन विचलित झाले. या गायींचा मृत्यू का झाला, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. चाऱ्याअभावी त्यांचा मृत्यू झाला असावा, असे छायाचित्रातून वाटत आहे. उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वाटत आहे, असे प्रियांका यांनी पत्रात म्हटलं आहे.
सरकार गायींची रक्षा करण्यात अपयशी -
ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. यावर काही दिवस चर्चा होते. मात्र, निर्णय काहीच घेतला जात नाही. यासाठी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थितीत होतो. सत्तेत येताना मुख्यमत्र्यांनी गौशाळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेश सरकारने छत्तीसगढ सरकारकडून प्रेरणा घ्यावी -
काँग्रेस सरकारने छत्तीसगढमध्ये ‘गोधन न्याय योजना’ लागू करून गौवंश संरक्षण चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्याकडून उत्तर प्रदेश सरकारने प्रेरणा घ्यावी आणि गायींप्रती आपला सेवाभाव कायम ठेवावा, असेही त्या म्हणाल्या. छत्तीसगढ सरकारने 2 रुपये किलोने शेण खरेदी करण्यास सुरवात केली आहे. महिन्याला सरकार 15 कोटी रुपयांच्या शेणाची खरेदी करत आहे. त्या शेणाचे खतामध्ये रुपांतर केले जात आहे. हे खत सरकारी आणि खाजगी संस्था आठ रुपये दराने विकले जात आहे, असे प्रियांका यांनी पत्रात सांगितले.
हेही वाचा -काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांची कारकीर्द, पत्रकारिता ते राजकारण...