नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दक्षिण दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा केल्याची माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. प्रियंकाच्या जवळच्या एका वरिष्ठ सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गृहमंत्रालयाने 30 जूनच्या संदेशात म्हटले होते की, प्रियांका गांधी यांना सीआरपीएफ कव्हरसह अखिल भारतीय तत्त्वावर 'झेड प्लस' सुरक्षा सोपविण्यात आली होती. मात्र, यात शासकीय निवासस्थानाचे वाटप किंवा राखीव ठेवण्याची कोणतीही तरतूद नव्हती.
पूर्व उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या प्रभारी असलेल्या प्रियांका यांना विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) यापुढे संरक्षण मिळणार नसल्याने त्यांना १ ऑगस्टपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. 1997 पासून प्रियांका रहात असलेला लोधी इस्टेट बंगला आता भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी यांना देण्यात आला आहे.
रविवारी प्रियांका गांधींनी भाजप नेते बलुनी यांना चहासाठी आमंत्रित केले होते. परंतु, आरोग्याचे कारण देत त्यांनी नम्रपणे नकार दिला. तथापि, त्यांनी बंगल्यात रहावयास आल्यानंतर प्रियांका यांना उत्तराखंडमधील पारंपारिक जेवण देण्याचे वचन दिले.
बलूनी यांनी प्रियांका यांना 'मांडूवे के रोटी', 'झांगोरे की खीर' (दोन्ही वेगवेगळ्या धान्यांची बनवलेली), ‘पहाडी रायता आणि भट्ट के चटणी' (काळ्या बीन्सची डाळ) असे पदार्थ बनवून त्यांच्या नवीन निवासस्थानी जेवू घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी प्रियांका यांनी दिलेल्या आमंत्रणाबद्दलही त्यांचे आभार मानले. बलूनी यांनी मुंबईत झालेल्या आपल्या कर्करोगाच्या उपचाराचा उल्लेख करत आपल्याला आणखी काही काळ काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, यापूर्वी सोमवारी प्रियांका गांधींनी बलुनी यांच्याशी फोनवर बातचित केली. यानंतर प्रियांका यांनी ट्विटरवरून आपण अनिल बलूनी आणि त्यांच्या पत्नीशी बोलल्याची माहिती दिली. तसेच, आपण त्यांच्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केल्याचेही म्हटले.