नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातीलकायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. कानपूरमध्ये अपहरकर्त्याला खंडणी देण्यास पोलिसांनीच सांगितल्याचा आरोप त्यांनी ठेवला आहे. राज्यात विकास दुबे चकमक प्रकरणावरून वादळ उठलेले असतानाचा कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी पुन्हा सरकारवर टीका केली.
फेसबुकवरून त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. 'कानपूरमध्ये एका तरुणाचे अपहरण करुन कुटुंबीयांकडे 30 लाख खंडणी मागीतली होती. कुटुंबीयांनी घर आणि सोने विकून 30 लाखांची व्यवस्था केली. पोलिसांच्या सांगण्यावरून पैशांची बॅग अपहरणकर्त्यांना देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटकही केली नाही अन् तरुणाची सुटकाही केली नाही. या घटनेनंतर कुटुंबीय अतीव दु: खात आहेत. हेच ते कानपूर, जेथे काही दिवसांपूर्वी मोठी घटना घडली होती. यावरून उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, याची तुम्ही कल्पना करु शकता, असे त्या म्हणाल्या.