गांधीनगर -आगामी लोकभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. विविध पक्ष मदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या सभा घेत आहेत. आपण जागरूक नागरीक व्हावे, यापेक्षा मोठी देशभक्ती कोणतीच नाही. तुमचे मत हे एक मोठे शस्त्र आहे, असे पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले.
गुजरातच्या गांधीनगर येथे काँग्रेसची आज जनसभा होती. या दरम्यान प्रियांका गांधी यांनी या निवडणुकांसाठी पहिल्यांदा सभेला संबोधीत केले.
तुमची जागरुकता आणि तुमचे मत हे एक मोठे शस्त्र आहे. मात्र, या शस्त्राने कोणालाही जखमी करता येत नाही, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. यापूर्वी अहमदनगर येथे काँग्रेसच्या कार्यकारीणी समितीची बैठक झाली. ही बैठक तब्बल ५८ वर्षानंतर पहिल्यांदा गुजरातमध्ये काँग्रेसची पार पडली आहे. काँग्रेसने या बैठकीमध्ये निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यावेळी निवडणुकांचे महत्वाचे मुद्दे दबलेले आहेत. आपण या निवडणुकांमध्ये आपले भविष्य निवडणार आहोत. त्यासाठी रोजगार, महिलांना सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या समस्या या निवडणुकांचे मुद्दे होणे गरजेचे आहे, असेही प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटले. जे लोक केवळ आपल्या स्वार्थाची गोष्ट करतात त्यांना सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला फैलावर घेतले. यावेळी माझा तुम्हाला आग्रह आहे की मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन ही प्रियांका गांधी यांनी केले.
पाटीदार समुदायाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आज झालेली काँग्रेससाठी बैठक आणि सभा महत्त्वाची होती. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. गुजरातच्या जामनगर लोकसभा क्षेत्रातून ते निवडणूक लढवणार, असा अंदाज लावला जात आहे.