मिर्जापूर - सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे. मात्र, पीडितांची भेट घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांचे दोन नातेवाईक मला भेटायला आले होते. आणखी १५ जणही मला भेटायला आले आहेत, मात्र, पोलीस आमची भेट होवू देत नाही. प्रशासनाची मानसिकता काय आहे? मला समजत नाही, असे गांधी म्हणाल्या. तसेच माध्यमांनी प्रशासनावर दबाव वाढवण्याचे आवाहन गांधीनी केले.
काल (शुक्रवारी) गांधींना ताब्यात घेतल्यापासून त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. सोनभद्र जिल्ह्यात हत्यांकाड झाले तेथे संचारबंदी असून कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्या कार्यकर्त्यांसह वाराणसीवरुन सोनभद्रला जात होत्या. मात्र, रस्त्यात पोलिसांनी अडवल्यापासून त्या पीडितांना भेटण्याच्या मागणीवर ठाम आहेत. नारायणपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह चुनार गेस्ट हाऊस येथे हलवले आहे. मात्र, त्या तेथेही धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.