नवी दिल्ली -व्हॉट्सअॅपवर भारतीय नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लघंन केल्यासंबधी काही माहिती समोर आली आहे. त्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांच्या फोनवर नजर ठेवण्यासाठी भाजप सरकारने इस्रायली कंपनीला कामाला लावले असेल, तर हे मानवाधिकारांचे घोर उल्लंघन आहे. याचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गुरुवारी गृहमंत्रालयाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. भारतीयांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध आहे. नागरिकांच्या गोपनीयतेच्या उल्लंघनास जबाबदार असणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. सरकारने कायद्यातील तरतुदीनुसार काटेकोरपणे कार्य केले असून प्रोटोकॉलचे अनुसरण केले आहे, असे गृहमंत्रालयाने पत्रकामध्ये म्हटले आहे.
सरकारने व्हॉट्सअॅपकडे मागितले स्पष्टीकरण -
भारत सरकारच्या माहिती व दूरसंचार मंत्रालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत व्हॉट्सअॅपला याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले होते.
काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही.