नवी दिल्ली -भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांची आज १०२वी जयंती आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेत्या आणि इंदिरा गांधींची नात असलेल्या प्रियांका गांधी यांनी आपल्या आजीला कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर आपल्या लहानपणीचे शुभ्रधवल छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये त्या इंदिरा गांधी यांच्यासह खेळताना दिसत आहेत. सोबत त्यांनी 'मला माहित असलेल्या सर्वात धाडसी महिलेच्या आठवणीत' अशा शीर्षकासह विल्यम अर्नेस्ट हेन्ली या कवीची कविता देखील पोस्ट केली आहे.
दुसरीकडे राहुल गांधी यांनीदेखील, सशक्त आणि समर्थ नेतृत्वासह महान संघटनकौशल्य लाभलेल्या आयर्न लेडी इंदिरा गांधींनी भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून उभारण्यात आपले मोलाचे योगदान दिले होते. माझ्या प्रिय आजीला, तिच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. अशा आशयाचे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. जानेवारी, १९६६ ते मार्च १९७७ आणि जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले.
हेही वाचा : सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही - केंद्रीय गृह मंत्रालय