नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. आज त्यावरच प्रियंका यांनी 'महात्मा गांधींचा मारेकारी देशभक्त? हे राम' असे ट्विट केले आहे.
महात्मा गांधींचा मारेकरी देशभक्त? हे राम, प्रियंकांचा साध्वीवर निशाणा - प्रियंका गांधी
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.
साध्वी या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्यांना भाजपकडून भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. साध्वी वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. गुरुवारीही महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील. गोडसे याला दहशतवादी म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जशास तसे उत्तर दिले जाईल, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. या विधानावरून वाद होताच भाजपकडून झालेल्या कानउघडणीनंतर प्रज्ञासिंह यांनी आपले विधान मागे घेत माफी मागितली होती.
यापार्श्वभूमीवर प्रज्ञासिंह यांच्यावर प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. 'महात्मा गांधींचा मारेकरी देशभक्त?.. हे राम! उमेदवाराच्या विधानाशी असहमती दर्शवली म्हणजे काम संपले असे होत नाही. भाजपमध्ये याबाबत स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्याची हिंमत आहे का?' असे प्रियंका यांनी म्हटले आहे.