नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराने सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. १९ वर्षीय दलित तरुणी शेतात गेली असता चार सवर्णतरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होता. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. काल (मंगळवार) दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत.
प्रियंका गांधी यांनी एक ट्विट करून योगी आदित्यनाथ यांना बलात्काराच्या घटनेवरून प्रश्न केले आहेत. 'मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारू इच्छिते, कुटुंबियांकडून मृतदेह हिसकावून घेत जाळण्याचा आदेश कोणी दिला? मागील १४ दिवसांपासून तुम्ही झोपले होता काय? तेव्हा का काही कारवाई केली नाही? हे असे कधीपर्यंत चालणार? तुम्ही कसले मुख्यमंत्री आहात, अशा प्रश्नांची सरबत्ती प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.