नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर हल्लाबोल केला आहे. आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी अटक झालेल्या निवृत पोलीस निरीक्षकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पायी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी गळा पकडल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.
उत्तर प्रदेश पोलीस लोकांना येण्या-जाण्यास अडवत आहे. लखनौमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी निवृत पोलीस निरीक्षक एस.आर. दारापुरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आम्हाला अडवले. महिला पोलिसाने माझा गळा पकडत गैरवर्तन केले. मात्र, माझा निश्चय अटळ असून आंदोलनामध्ये पोलिसांच्या दडपशाहीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकासोबत मी उभी आहे. भाजप भ्याड कृत्य करीत आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी असून आणि मी उत्तर प्रदेशात कुठे जाईन, याचा निर्णय भाजप सरकार घेणार नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.