पणजी- भाजपच्या धोरणाला कंटाळून विविध पक्षांच्या आघाड्या होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चितच आहे, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे चव्हाण म्हणाले की, मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. बेरोजगारी वाढत असल्याने युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला आहे. तर नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. केंद्रातील भाजप आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आघाड्या करत आहेत. भाजप निवडून येणार नाही याला सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. लोकांमध्ये सरकार विषयी विश्वासघातकी भावना निर्माण झाली आहे. भाजप धार्मिक आधारावर लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.